नाशिक : नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
जिंदाल कंपनीत पॉलीफायर या प्लांटला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून 17 जणांना रेस्क्यू करण्यात आले. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे भेटीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.
जखमींवर सरकारी पैशातून उपचार होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सदर घटना अतिशय गंभीर आहे. ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकली. आग विझविण्यासाठी आपली यंत्रणा काम करत आहे. जखमी कामगारांमध्ये दोन जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. या दुर्घटनेतील जखमींवर शासकीय पैशांनी उपचार होतील. मी जखमींना भेटलो आहे. डॉक्टरांना देखील भेटलो आहे. संपूर्ण उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच सविस्तर चौकशीतून माहिती समोर येईल. सध्या इथे कुणीही अडकल्याची शक्यता कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, स्थानिक आमदार यांनी देखील पाहणी केली.