नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेच्या शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या पथकाकडून केले जाणार आहे. आजपासून शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण सुरू होणार असल्याची शक्यता आहे. एएसआयला 20 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग (III) सोनिका वर्मा यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शाही ईदगाह मशीद अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला आहे. हिंदू बाजू म्हणते की ही मशीद ज्या ठिकाणी बांधली आहे ते भगवान कृष्णाचे जन्मस्थान आहे. हा संपूर्ण वाद 13.37 एकर जमिनीच्या मालकीचा आहे. त्याच वेळी, शाही मस्जिद ईदगाहचे वकील तनवीर अहमद म्हणतात की ते न्यायालयाच्या या आदेशाविरोधात 20 जानेवारीला आक्षेप नोंदवणार आहेत.
औरंगजेबाने दिले होते आदेश
औरंगजेबाने काशी आणि मथुरेतील मंदिरे उद्ध्वस्त करून मशिदी बांधल्याचा हिंदूंचा दावा आहे. औरंगजेबाने 1669 मध्ये काशीतील विश्वनाथ मंदिर पाडले होते आणि 1670 मध्ये मथुरेतील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला होता. यानंतर काशीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली.
13.37 एकर जागेचा आहे वाद
– मराठ्यांनी ईदगाह मशिदीजवळ 13.37 एकर जागेवर भगवान केशवदेव म्हणजेच श्रीकृष्णाचे मंदिर बांधले. पण हळूहळू हे मंदिरही जीर्ण होऊ लागले. काही वर्षांनंतर, भूकंपात मंदिर नष्ट झाले आणि जमीन ढिगाऱ्यात बदलली.
– 1803 मध्ये ब्रिटीश मथुरेत आले आणि 1815 मध्ये त्यांनी कटरा केशवदेवच्या जमिनीचा लिलाव केला. या ठिकाणी केशवदेवाचे मंदिर होते. बनारसचा राजा पटनिमल याने ही जमीन विकत घेतली. ही जमीन त्यांनी 1,410 रुपयांना विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
– राजा पटनिमलला या ठिकाणी भगवान केशवदेवाचे मंदिर पुन्हा बांधायचे होते, परंतु ते तसे करू शकले नाहीत. 1920 आणि 1930 च्या दशकात जमीन खरेदीवरून वाद सुरू झाला. ईदगाह मशिदीचा काही भाग ब्रिटिशांनी विकलेल्या जमिनीतही असल्याचा दावा मुस्लिम पक्षाने केला आहे.
– फेब्रुवारी 1944 मध्ये, उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी ही जमीन राजा पटनिमल यांच्या वारसांकडून 13,500 रुपयांना विकत घेतली. स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये श्री कृष्ण जन्मस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि ही 13.37 एकर जमीन कृष्ण मंदिरासाठी या ट्रस्टला देण्यात आली.
वादग्रस्त समझोत्याची कहाणी
– मंदिराचे बांधकाम ऑक्टोबर 1953 मध्ये सुरू झाले आणि 1958 मध्ये पूर्ण झाले. या मंदिरासाठी उद्योगपतींनी देणगी दिली. हे मंदिर शाही ईदगाह मशिदीला लागून बांधण्यात आले आहे.
– 1958 मध्ये आणखी एक संस्था स्थापन झाली, तिचे नाव होते श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान. कायदेशीररित्या या संस्थेचा 13.37 एकर जमिनीवर हक्क नव्हता. परंतु 12 ऑक्टोबर 1968 रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद ईदगाह ट्रस्टशी करार केला. मंदिर आणि मशीद दोन्ही 13.37 एकर जागेवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
– श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्टला हा करार मान्य नाही. ते या कराराला फसवणूक म्हणतात. संपूर्ण वाद 13.37 एकर जमिनीचा आहे, त्यापैकी 10.9 एकर श्रीकृष्ण जन्मस्थानाजवळ आहे आणि 2.5 एकर शाही ईदगाह मशिदीजवळ आहे.