पुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत नांदेड येथे आढळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवशंकर शिंदे असे मृत झालेल्या वकिलाचे नाव असून वाकड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून वकिलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी अॅड. शिवशंकर शिंदे 31 डिसेंबरच्या दुपारपासून कार्यालयातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर कुटुंबियांकडून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांकडून वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत शिंदे यांचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळल्याने कुटुंबीयांसह सर्वांनाच हादरा बसला आहे.
नांदेड पोलिसांनी तिघांना केली अटक
वकिलाचे नात्यातीलच विवाहित महिलेशी संबंध होते अन् त्या महिलेच्या पतीनेच अपहरण करून ही हत्या केली अन् पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हे तपासात समोर उघड झाले आहे. नांदेड जिल्ह्यात हा मृतदेह आढळला असून तिथल्या पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यातही घेतलं होतं. आता त्या तिघांचा ताबा पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेला आहे. त्यात संबंधित विवाहित महिलेचा पती, पतीचा भाचा आणि त्याचा चालक अशा तिघांचा यात समावेश आहे.
ड्रममध्ये टाकून केले अपहरण
तिघांनी वकिलाचे 31 डिसेंबरच्या दुपारी कार्यालयातून अपहरण केले. हात-पाय अन् तोंड बांधून वकिलास एका ड्रममध्ये बसवले. मग हा ड्रम एका टेम्पोत टाकून नांदेड जिल्ह्याच्या टोकाला आणले अन् तिथंच अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.