वरणगाव : वरणगाव शहरात प्रशासन कार्यकाळात विविध नागरी सुविधा नागरीकांना मिळत नसून नागरीक त्यापासून वंचित राहत असल्याने वरणगाव शहर शिवसेनेतर्फे सोमवार, 2 रोजी नगरपालिकेबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. येत्या चार दिवसात नागरी समस्या सोडवा अन्यथा शिवसेनेतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्याचा ईशारा प्रशासक/मुख्याधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
शिवसेनेतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात नागरीकांना पिण्याचे पाणी आठ ते दहा दिवसांनंतर मिळत आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या जलकुंभातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तसेच नागरी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गावात आणि कॉलन्यामध्ये घंटागाड्या ट्रॅक्टर दररोज पोहोचत नसल्याने कचरा रस्त्यावर पडून सर्वदूर उकिरडे साचून दुर्गंधी पसरली आहे. दोन-तीन घंटागाड्याच सुरू असून बाकीच्या भागातील घंटागाड्या कुठे? कचरा संकलन करण्याचा मक्तेदार शहरात तफिरकुन देखील पाहत नाही. त्यामुळे घंटागाड्या नियमित कचरा संकलित करीत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात प्रशासन संबंधित ठेकेदाराला बोलत का नाही? त्याला अभय कोणाचे हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
आंदोलनात यांची होती उपस्थिती
शहरात विद्युत खांब वरील स्ट्रीट लाईट दिवसा सुरूच असल्याचे प्रमाण वाढले आहे. ते बंद करण्यासाठी तसदी कोणीच घेत का नाही? त्याचा नाहक वीज बिलाचा भुर्दंड नगरपरिषदवर पडत आहे. मुख्याधिकारी समीर शेख हे नाशिक, मुंबई, औरंगाबाद, जळगांव या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाच्या व्यापामुळे जात येत असल्याने ते व्यस्त असल्याने ते इकडे लक्ष कमी देत आहे. निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, उप तालुका प्रमुख सुभाष चौधरी, युवा जिल्हाआधिकारी चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख राम शेटे, अशोक शर्मा, माजी उपशहर प्रमुख सुनील भाई, शिवा भोई, शाखाप्रमुख संजीव कोळी, शाखाप्रमुख सत्तार शेख, इरफान शेख, प्रल्हाद माळी, आबा सोनार, विक्की मोरे, सुखदेव धनगर, राजेश वाकोदे यांची उपस्थिती होती.
मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला
गावात तसेच कॉलनीत रात्री बेरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर मोकाट कुत्रे धावून येतात. त्या मोकाट कुत्र्यांचा देखील त्वरित बंदोबस्त करावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
वरणगाव नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून प्रांतधिकारी रामसिंग सुलाने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रशासक सुलाने हे वरणगावात फिरकुन देखील पाहत नसल्याने नागरी समस्यांमध्ये वाढ झालेली आहे. प्रशासक सुलाने यांनी वरणगाव शहरात दोन दिवसा नंतर भेट दिल्यास नागरी सुविधाची समस्या सुटेल अशी मागणी निवेदनामध्ये आहे.