पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. ते 59 वर्षांचे होते.
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली 35 वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत 2017 मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती.
दोन वर्षांपासून होते आजारी
आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. एप्रिल 2022 पासून त्यांची तब्बेत खालावत गेली. दिवाळीच्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक होत झाली. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजू जगताप असा मोठा परिवार आहे.
अशी होती राजकीय वाटचाल…
पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांच्याकडे पाहिले जायचे. 1986 मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन 2000 मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणली
2009 मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला. नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. 2017 मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. आता त्यांच्या निधनामुळे भाजपा पुढे नेतृत्वाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.