जळगाव: माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिवाळी अधिवेशनात माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाही असाही आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यामध्ये मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे.
आमदार एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर उत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांचा बोदवडचा प्रश्न सुटला. त्यांचेकडे प्रश्नच नाहीत एवढे काम त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रश्नच कुठे राहिलाय. ते तर कामाचे महामेरु आहेत, पाणी आणण्यासाठी जलसंपदा खाते त्यांचेकडे होते. तापी निम्म प्रकल्प त्यांनी पुर्ण केलाय. त्यांनी कुठले काम अपुर्ण ठेवले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे प्रश्नच नसून प्रश्न सुटण्याचा प्रश्नच येत नाही, असे पालकमंत्री म्हणाले.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे
अधिवेशनात एकमेकांवर आरोप करण्यातच फक्त वेळ गेला असं स्पष्ट बोलत खडसे यांनी हिवाळी अधिवेशनावर आपली नाराजी व्यक्त केली. अधिवेशनात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या एकाही प्रश्नाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या कोणत्याच प्रश्नाला या ठिकाणी विचारले गेले नाही. ग्रामीण भागातल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अधिवेशनात प्रश्न हे सर्व अनुत्तरीत राहिले, मला याविषयी खंत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर दिली होती.