पुणे : पुण्यात हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून पुण्यात एकाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच आता व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याने एका ग्रुप ॲडमिनला बेदम मारहाण करत त्याची जीभ कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हरपळे असे जीभ कापलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रीती किरण हरपळे (वय-38) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ऑफिसमध्ये जाऊन मारहाण
पुण्यातील फुरसुंगीत ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी आहे. तक्रारदार प्रिती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. तक्रारदार व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. सुरेश पोकळे यांनी हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना व्हाटॅसअपवरुन ‘ओम हाईटस ऑपरेशन’ या ग्रुप मधून रिमुव्ह का केले आहे? असा मेसेज केला. परंतु त्यास हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे पोकळे स्वतःहून हरपळे यांना भेटण्यास त्यांच्या ऑफिसमध्ये गेले.
मारहाणीत जीभच तुटली
पोकळे याने हरपळे यांना ग्रुपमधून काढून टाकल्याचा जाब विचारला. त्यावर ग्रुपमध्ये कोणीही कसलेली मेसेज टाकत आहे, त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला असल्याचे हरपळे यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या पोकळे याने हरपळे यांना बेदम मारहाण केली. पोकळे सोबत आलेल्या इतर चारपाच इसमांनीही हरपळे यांना बेदम मारहाण केली. हरपळे यांच्या तोंडावर मारहाण केल्याने त्यांची जीभ कापली गेली आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. हडपसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एन. शेळके हे तपास करत आहे.