जळगांव : जळगाव मनपाच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी भरघोस वेतन घेऊनही निर्णायक कामे केलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजवरच्या कामाचे ऑडीट करण्यात यावे. तसेच शासनाने मनपा आयुक्तपदी गेडाम साहेब किंवा तुकाराम मुंडे यांचे सारखे कर्तबगार, निष्ठावंत कार्यतत्पर आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.
निवेदनात नमूद केले की, मनपाचे आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती तत्कालीन सेवानिवृत्त आयुक्त सतिष कुलकर्णी यांचे जागी गेल्या सहा महिन्यापूर्वी आयुक्तपदी कायद्याच्या चौकटीत बसत नसतांनाही केली गेल्याचे कळते. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना पदास अनुसरुन व असलेल्या अधिकारानुसार आजपर्यंत शहरासाठी व नागरिकांसाठी कुठल्याही मुलभुत सुखसुविधा दिलेल्या नाहीत. तसेच प्रशासनात योग्य त्या कामकाजाविषयक ठोस पावले उचलली नसून निर्णायक केलेली दिसून येत नसल्याचे म्हटले आहे.
डॉ. गायकवाड यांच्या कामाचे ऑडीट करा
वास्तविक प्रशासन त्यांना दरमहा रुपये १,३९,६५६ रुपये एवढे भरघोस वेतन प्रशासकीय कामाच्या मोबदल्यात अदा करत असते. त्यांची पगाराविषयक माहिती ही माहिती अधिकार अंतर्गत मागणी करुन प्राप्त केली आहे. जर राज्य शासन आयुक्त पदासाठी कामाच्या बदल्यात एवढे परिपूर्ण वेतन व इतर सुखसोई त्यांना पुरवित असेल तर ते घेत असलेल्या पगाराच्या मोबदल्यानुसार प्रशासन चालविण्याची तसेच नागरिकांना त्यांच्या मुलभुत गरजा, सेवा त्यांना पुरविणे क्रमप्राप्त आहे. परंतु येथे तसे दिसून येत नाही. म्हणून डॉ. गायकवाड यांच्या नियुक्तीपासून ते आजपावेतो त्यांनी केलेल्या दैनंदिन प्रशासकीय कामाचे ऑडीट (विशेष लेखा परिक्षण) करण्यात यावे. व त्यांनी पाच महिन्यात घेतलेले एकूण वेतन ६,९८,२८० रुपये व केलेली प्रशासकीय कामे यांचा ताळमेळ बसत नाही असे दिसून येत असल्याचे नाटेकर यांनी म्हटले आहे.
विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
डॉ. विद्या गायकवाड यांचे जागेवर सरकारने मनपा आयुक्तपदी गेडाम साहेब किंवा तुकाराम मुंडे यांचे सारखे कर्तबगार, निष्ठावंत कार्यतत्पर आयुक्त पाठवावा. जेणेकरुन मनपाची कोलमडलेली प्रशासन व्यवस्था सुधारण्यास, गतीमान व पारदर्शक होण्यास मदत होईल. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून, तक्रारीच्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.