मुंबई : हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे असल्याचे सांगून स्वराज्यरक्षक म्हंटले पाहिजे, असं वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात अजित पवार यांच्याविरोधात भाजपने आंदोलन केले. त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपही झाले. त्यांच्या या विधानावरुन वाद वाढत असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भूमिका मांडली आहे.
आज सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार आले असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावर भाष्य केले. तसेच अजित पवार हे लवकरच माध्यमांसमोर येऊन बोलतील असे सुतोवाच देखील केले.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, अजित पवारांचं संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिलं. धर्मवीर किंवा स्वराज्य रक्षक यावरुन वाद नको. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटल तरी अयोग्य नाही. धर्मवीर, स्वराज्य रक्षक या दोन्ही उपाधी योग्यच आहे. कुणी धर्मवीर म्हणत असतील आणि धर्माच्या अँगलने पाहत असतील तर त्यांनाही माझी तक्रार नाही. त्या व्यक्तीचं ते मत आहे. त्याला ते मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्य रक्षक संभाजी म्हणा, त्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. ज्याला जो उल्लेख करायचा तो उल्लेख करु शकतो, असं शरद पवार म्हणाले.
धर्मवीरबद्दल काळजी वाटते
धर्मवीरबद्दल मला एक काळजी वाटते. मी जेव्हा ठाण्याला जातो तेव्हा काही नेत्यांचा उल्लेख धर्मवीर असा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील एकेकाळचे सहकारी होते, त्यांचा उल्लेख ते अनेकदा करतात. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण त्यांचाही धर्मवीर असा उल्लेख केला जातो, असंही शरद पवार म्हणाले. धर्मवीर असो किंवा संभाजी रक्षक असो, त्या व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दलची जी आस्था आहे, त्या आस्थेच्या पाठीमागचा जो विचार आहे, त्यासाठी वाद घालण्याचं कारण नाही. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा, स्वराज्य रक्षक म्हणायचं असेल तर तसं म्हणा, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.