जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस कोव्हीड विषाणूचे लक्षणे असलेले ७ रुग्ण आढळून आले आहे. हे सातही रुग्ण ठणठनित असून ते सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केळे.
राज्यात डेल्टा प्लस कोव्हीड विषाणूचे लक्षण असलेले २१ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी ७ रुग्ण हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्याबाबत जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन एस चव्हाण उपस्थित होते. जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, कोरोनाच्या विविध तपासण्यांसाठी जिल्ह्यातून दरमहा १०० नमुने तपासणीसाठी पाठवले जातात. ज्या ७ रुग्णांमध्ये या विषाणूंचे लक्षणे आढळली असून हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून एकाच क्षेत्रातील आहेत. त्यांचे नमुने मे २०२१ मध्ये घेण्यात आले होते, ते कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले होते. मात्र या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तसेच त्यांचे लसीकरणही झालेले नव्हते. त्याच बरोबर त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल न करता ते बरे झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तरी प्रत्येक नागरिकाने कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.