मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री अनिल परब यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीकडून अनिल परब यांच्याशी निगडीत 10 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता 10.20 कोटींची आहे.
ईडीनं या कारवाई संदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. यात अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतर ठिकाणची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अनिल परब यांनी मात्र या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचं भाष्य केलं आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
तक्रारीवरून कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.
ईडीने परिपत्रकात काय म्हटले आहे?
ईडीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्या. त्यामुळेच ईडीने मुरुड दापोली मधली 42 गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.