जळगाव : मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. त्यामुळे पतंग आणि मांजाला मोठी मागणी असून, दुकानांमध्ये पतंग, मांजा विक्रीसाठी आहेत. मात्र, मांजामुळे पक्षांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या पथकाने जोशीपेठेत तपासणी केली असता एका दुकानात बंद कुलरमध्ये नायलॉन मांजा लपवून विक्री होत असल्याचे आढळून आले.
मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी पालिकेच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे यांच्या पथकाने जोशीपेठेतील ११ दुकानांची अचानक तपासणी केली. यावेळी वृतिक पुरन खिची यांच्या दुकानात बंदी असलेला नायलॉन मांजा आढळून आला. खिची यांनी हा मांजा एका बंद अवस्थेतील कुलरमध्ये लपवून ठेवलेला होता. या प्रकरणी पालिकेने खिची यांच्यावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली.
महापालिकेकडून कारवाई सुरुच राहणार
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने नायलॉन मांजा विक्री करणे आणि बाळगण्यावर बंदी आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडे हा मांजा आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे. दरम्यान, सन २०२१मध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकून एका २३ वर्षीय डॉक्टरची मान कापली गेली होती. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने त्यात त्यांचे प्राण वाचले होते. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची आहे.