जळगाव : पाणी पुरवठा विभागातर्फे मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आज (दि. ५) होणार पाणी पुरवठा बंद राहील. यामुळे रोटेशमध्ये एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार असून, गुरवारचा पुरवठा शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
शहरात अमृत अभियानांतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीची जोडणी सुरू आहे. महिनाभरात शहरातील सर्वच जलकुंभांना नवीन जलवाहिनी जोडणीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाणार आहे. जुन्या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद करून नवीन जलवाहिनीतून पुरवठा करण्यासाठी जोडणीचे काम सुरू आहे. मेहरूण परिसरात डी-मार्ट चौकात अमृत योजनेंतर्गत टाकलेली १२०० मीमी व्यासाची जलवाहिनी आकाशवाणी मागे असलेल्या जलकुंभाला जोडण्याला येणार आहे. या कामाला बुधवारी सुरूवात झाली आहे.
रोटेशनमध्ये होणार बदल
गुरूवारी हे काम सुरू राहणार आहे. मुख्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह बंद करावा लागणार असल्याने ५ रोजी शहरातील पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ५ रोजीचा पुरवठा ६ जानेवारीला तर ६ व ७ जानेवारीचा पुरवठा ७ व ८ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
सिमेंट जलवाहिनी बंद होणार
शहरात नगरपालिका काळात पूर्वी सिमेंटची जलवाहिनी टाकली आहे. आता अमृत योजनेत डीआय पाइप टाकण्यात आले आहेत. नेहमीच्या गळतीची समस्या सोडवण्यासाठी मनपाकडून जलकुंभांना जलवाहिनी जोडणीचे काम सुरू आहे. आगामी काळात सिमेंटची जलवाहिनी बंद होईल.