जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटलचे डॉ निलेश किनगे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे अवमान व छळ केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी तक्रार नशिराबाद येथील दीपक छगन कावळे यांनी याज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांना पाठवले आहे.
दरम्यान या तक्रारीची प्रत व फिर्याद त्यांनी जिल्हापोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महापौर, रामानंद पोलीस ठाणे यांच्याकडे देखील दिली आहे. दीपक कावळे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी शहरातील ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आईला उपचारासाठी दाखल केले होते. त्या कोरोना संक्रमित असल्याचे डॉ. निलेश किनगे यांनी तोंडी सांगितले. रुग्णाने २६ दिवस तेथे उपचार घेतला. नियमानुसार अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे बिल अपेक्षित होते. याच साठी दीपक कावळे यांनी डॉ. निलेश किनगे व त्यांचे मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांना शासनाच्या नियमानुसार बिल घेण्याची विनंती केली. परंतु , डॉ. किनगे व त्यांचे व्यवस्थापक पाटील यांनी सांगितले की, पैसे देत असाल तर ठीक आहे. अन्यथा व्हेंटीलेटर काढतो व तुमचे पेशंट आवारात आणून ठेवतो. त्यांचे काहीही होवो. अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधित रुग्णाचे नातेवाईक घाबरले. त्यांच्याजवळ पैसे नव्हते. शेवटच्या दिवशी त्यांनी ४ लाख ६० हजाराचे बिल काढल्यावर नातेवाईकांना धक्काच बसला. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावर सुनावणी होऊन २ लाख ४४ हजार रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाला सहा महिने झाले असून डॉ निलेश किनगे रुग्णाच्या नातेवाईकांची दिशाभूल करतात आणि डॉ. सांगतात तू कोणाकडेही गेला तरी ते पैसे तुला परत मिळणार नाही. डॉ किनगे व त्यांच्या व्यवस्थापकाकडून आपला मानसिक छळ सुरु असून प्रशासनाने संबंधिता विरुद्ध फौजदारी कारवाई करावी. अशी मागणी कावळे यांनी केली आहे.