जळगाव : महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात वाळू वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानक पाहणी केल्याने अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली. यावेळी एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. यानंतरही अवैध वाळू उपसा थांबण्याचे नावच घेताना दिसत नसून, वाळू माफियांची मुजोरी वाढल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी अमन मित्तल हे जळगाव जिल्ह्याधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी बेकायदेशीर वाळू उपशावर कार्यवाहीचा धडाका लावला होता. एवढेच नाही तर मध्यरात्री थेट नदी पात्रात उतरून जिल्हाधिकारी यांनी वाळू माफियायांमध्ये धडकी भरली होती. मात्र वाळू माफियांनी देखील कार्यवाही पुरताच वाळू वाहतूक बंद ठेवली मात्र पुन्हा वाळू वाहतूक सुरू झाल्याने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सुरू केलेल्या बेकायदा वाळू उपसाविरोधी कार्यवाहीला आव्हान देण्यात येत आहे. वाळू उपसा मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरू झाला आहे.
आव्हाणे शिवारात वाढल्या तक्रारी
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी थेट गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी रस्त्यावर आले. दरम्यान, जिल्हाधिकारी आल्याचे पाहून काही वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक पसार झाली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आव्हाणे भागात सुरू असलेल्या बायपासच्या रस्त्याकडून थेट गिरणा नदीत उतरले.
वाळू माफियांना आधीच मिळते दौऱ्याची माहिती
जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात देखील रात्रभर गिरणा नदीपात्रात तपासणी केली होती. मात्र, त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी दौऱ्याची माहिती वाळू माफियांना आधीच मिळाल्यामुळे वाळू माफिया पसार झाले होते. सोमवारी देखील जिल्हाधिकारी गिरणा नदीपात्राकडे गेले असता, धरणगाव तालुक्याच्या हद्दीतून अनेक वाहने पसार झाली होती.