जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असे म्हणत गिरीश महाजन यामध्ये राजकारण करू नये असेही म्हंटले आहे.
पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. सर्वच क्षेत्रातून टीका होऊ लागल्यानंतर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. महाराजांचा अनादर करण्याचा माझा कुठेही हेतू नव्हता, मी महाराजांचा किती समर्थक आणि अनुयायी आहे हे सर्वांना माहिती आहे, शेवटी महाराज हे महाराज आहेत. महाराजांच्या नावाचा माझ्याकडुन अनवधानाने एकेरी उल्लेख झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.
अमोल मिटकरींना टोला
विरोधक विकास कामाबद्दल बोलू शकत नाहीत. त्यामुळे ते माध्यमात जाऊन आपला अनवधानाने बोललेला एखाद शब्द घेऊन त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण महाराजांचे नेहमीच चाहते राहिले आहोत असे म्हणत अमोल मिटकरी यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीच गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख केल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती, त्यावरून गिरीश महाजन यांच्यावर टीका होऊ लागली होती.