चाळीसगाव : चाळीसगाव तालुका कर्तव्यदक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामगिरीसाठी ओळखला जातो. मात्र चाळीसगाव नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना विवाह नोंदणीसाठी हेलपाटे मारावे लागत आहे.
साधारणतः कुठल्याही शहरात विवाह नोंदणी ही नगरपालिका कार्यालयात केली जाते. मात्र चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधीक्षक यांना निबंधक विवाह मंडळ व विवाह म्हणून कामकाज बघणे बाबत आदेश दिले आहेत.
अगोदर पालिकेतच व्हायची विवाह नोंदणी
नगरपरिषद क्षेत्रात विवाह नोंदणी निबंधक म्हणून वैद्यकिय अधिकारी, नगरपालिका किंवा वैद्यकिय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी वैद्यकिय अधिकारी, NUHM यांचेकडे कागदपत्र पडताळणी व प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे कामकाज सोपवले होते. व इतर सर्व कामकाज विवाह नोंदणी विभाग नगरपरिषद, चाळीसगांव हे करीत होते.
मुख्याधिकारी यांनी नोंदणीस दिला नकार
नागरिकांना नागरी सुविधा पुरविणेकामी Integrated Web Based Portal अंतर्गत विवाह नोंदणी सेवा आनलाईन देण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेव्दारे विवाह नोंदणीबाबत करण्यात येणारे सहकार्य यापुढे करता येणार नाही असे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे. मुख्याधिकारी यांनी अधिसुचनेनुसार वैद्यकिय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय, चाळीसगांव या नात्याने त्यांनी निबंधक विवाह मंडळ व विवाह म्हणून कामकाज पहावे या बाबत कळविले आहेत. प्रशासनाच्या या वादात सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.