जिल्ह्यातील रूग्णांसाठी २० टन ऑक्सीजनचा साठा; आपत्कालीन स्थितीत होणार उपयोग
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडालेला असतांना सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र फक्त बाता मारण्यात मशगुल झालेले आहेत. या पार्श्वभूमिवर आज माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी जिल्ह्यासाठी तब्बल २० टन ऑक्सीजनचा साठा उपलब्ध करून दिला असून याचा आपत्कालीन स्थितीत उपयोग होणार आहे. यामुळे गिरीशभाऊंनी आयसीयूमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला प्राणवायूने नवसंजीवनी दिल्याचे दिसून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाने हैदोस घातला आहे. दररोज कोरोना बाधीतांची संख्या वाढीस लागली असून मृत्यूंची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तर यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी याला सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील जनता अक्षरश: वार्यावर असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी फक्त बाता मारत असल्याने जनता त्रस्त झालेली आहे. तर दुसरीकडे आ. गिरीशभाऊ महाजन यांनी मात्र ग्राऊंड लेव्हलवरून काम सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी एफडीएच्या आयुक्तांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यात पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याला मान्यता मिळाल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे. यानंतर आता गिरीशभाऊंनी प्राणवायूच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. पालकमंत्री महोदयांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे काम शून्य आहे. जिल्ह्यात फक्त एकाच ठिकाणी तो देखील भाजपचे आमदार असणार्या भुसावळमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून अन्य ठिकाणी उभारण्यासाठी कागदी घोडे नाचविण्यात येत आहे. या बाबींचा विचार करता, आ. गिरीशभाऊ महाजन यांनी खासगी पातळीवरून हालचाली करून जिल्ह्यासाठी तब्बल २० टन इतका ऑक्सीजन उपलब्ध करून दिला आहे. याचा साठा करण्यात येणार असून जिल्ह्यात जिथे कुठे ऑक्सीजनची कमतरता भासेल तिथे याचा वापर केला जाणार आहे. यामुळे जे काम सत्ताधार्यांनी करायचे ते त्यांच्याऐवजी गिरीशभाऊंनी करून जिल्ह्यातील रूग्णांना दिलासा मिळाला असून भविष्यात यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहे. एका अर्थाने आ. महाजन यांनी आयसीयूमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला प्राणवायूने नवसंजीवनी दिल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.