जामनेर : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यातील एका सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख केला होता. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, जामनेर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजप नेते तथा क्रीडा मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असे म्हणत गिरीश महाजन यामध्ये राजकारण करू नये असेही म्हंटले आहे. महाजनांच्या माफीनाम्यानंतरही आज जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन आंदोलन करण्यात आले.
जाहिर माफी मागावी
गिरीश महाजन यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकेरी उल्लेख झाल्याचं निदर्शनास आणून दिले होते. जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरून मुर्दाबादच्या घोषणा देत मंत्र्यांचा पुतळा जाळला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड म्हणाले की, जनतेच्या मुख्य समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपचे लोक महापुरुषांचा अवमान करण्यात व्यस्त आहेत. या प्रश्नावर मंत्र्याने महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी माविआच्या वतीने आम्ही सर्वांची मागणी आहे. राष्ट्रवादीकडून विलास राजपूत, किशोर पाटील, अरविंद चितोडिया तर काँग्रेसचे शंकर राजपूत, एस.टी. पाटील, रउफ शेख, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर बोरसे, राहुल चव्हाण यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.