जळगाव : मराठा विद्याप्रसारक संस्थेत सन 1998 ते 2002 या कालावधीत संचालक, चेअरमन पदावर नसताना देखील खोटे शिक्के, प्रोसेडींग बुक तयार करून लाखोंचा अपहार केला, अशा आशयाची फिर्याद नीलेश भोईटे यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मविप्र संस्था त्या काळात तानाजी भोईटे यांच्या ताब्यात होती. यावेळी अॅड. पाटील व साळुंखे यांनी संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र, शिक्के तयार केले. शहाजी त्र्यंबक साळुंखे यांना चेअरमनपदी दाखवले. २८ डिसेंबर १९९७ रोजी निवडणूकीसाठी सभा घेऊन खोटे प्रोसेडींग बुक तयार केले.
खोटे दस्ताऐवज तयार केले
या सभेत 22 संचालकांची निवड झाले, असे खोटे दस्ताऐवज तयार केले. त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे वेळोवेळी पाठवलेले चेंज रिपोर्ट देखील फेटाळण्यात आले आहे. या माध्यमातून अॅड. पाटील व साळुंखे यांनी संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करुन लाखाे रुपयांचा अपहार केला आहे. असे निलेश भोईटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान,नीलेश भोईटे यांनी चार दिवसांपूर्वी फिर्याद दिली होती. त्यानुसार आज पोलिसांनी भादवि कलम ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१, ४७२, १२० ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
राजकीय दबावामुळे खोटा गुन्हा : अॅड. पाटील
याच आशयाची फिर्याद सन २०१८ मध्ये पी. एस. पाटील यांनी दिली होती. तर निलेश भोईटे हे साक्षीदार होते. सन २०२१ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने तपासाअंती हा गुन्हा सी समरी’ म्हणून निकाली काढले होता. २५/२६ वर्षानंतर त्याच आशयाची शब्दनीशब्द सारखी असलेली फिर्याद पुन्हा देण्यात आलीय. अगदी कलमं देखील तीच लावण्यात आली आहेत. मंत्री गिरीष महाजन यांच्या दबावाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं म्हणजे पोलिसांनी असा खोटा गुन्हा कसा दाखल करून घेतला याचं मला आश्चर्य वाटतंय. पण संघर्ष करण्यासाठी आम्ही तयार आहोत, खोट्या गुन्ह्यांना घाबरणार नाहीत, अशी प्रतिक्रिया अॅड. विजय पाटील यांनी दिली आहे.