मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असे, शरद पवार यांनी म्हटले आहे. 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.
शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन काम करायचे असते. मात्र, अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे काम नाही. त्यांच्याकडून इतरांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जात आहे, हे चुकीचे आहे. जरी शिवसेनेत दोन गट पडले असले तरी कडवा शिवसैनिक हा प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहे. तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचा फायदाच होणार असल्याचे शरद पवार म्हणाले.
सीमावादावर मुख्यमंत्र्यांनी नीट बाजू मांडावी
यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीमावादाची केस कोर्टात सुरू आहे. या पूर्वी देखील सीमा प्रश्नावर दोन बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही बैठक घेऊन आपली बाजू नीट मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणात हरिश साळवे यांना वकील म्हणून नेमण्याबाबत सर्वांचं एकमत झालं आहे. अंतिम निर्णय आल्यास समाधानाची गोष्ट असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यपालांनी प्रतिष्ठा गमावली
यावेळी शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अनेक राज्यपाल या राज्यात पाहिले आहेत, त्यांनी राज्याच्या हिताचे मार्गदर्शन केले. मात्र हे राज्यपाल सतत वादग्रस्त व्यक्तव्य करतात. त्या पदाची प्रतिष्ठा कोश्यारी यांच्याकडून राखली जात नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.