मुंबई : हैदराबाद येथे अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या मानाच्या स्पर्धेची गदा पुण्याचा जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकावली आहे. अंतिम सामन्यात अभिजीतने एकतर्फी वर्चस्व राखले आणि हरयाणाचा पैलवान सोमविर याला 5-0 अशा गुणांनी पराभूत करत यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला.
भारतीय शैली कुस्ती महासंघाने हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय 51 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. यात अभिजीने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बाब आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अभिजीतने हरियाणाच्या सोमवीरवर एकदाही वरचढ होण्याची संधी दिली नाही. अभिजीतने 5-0 ने मात करत हिंद केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं.
महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला
अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. 2017 साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटकेने नेत्रदिपक यश मिळवून महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता तसेच त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मिळालं होतं. आत्ताही अभिजीतने हिंद केसरीचा किताब मिळवून आपल्या यशाची घोडदौड सुरुच ठेवली आहे.