मुंबई : येत्या महिन्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी भाजपकडून 3 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
भाजपने कोकण विधानपरिषदेसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना तर पश्चिम विदर्भातून रणजीत पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या समन्वयाने पाचही विधानपरिषदेच्या जागा लढविणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
नागपूरचा निर्णय गुलदस्त्यात
दरम्यान, यासोबतच नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाकरिता भाजपने उमेदवार जाहीर केलेला नसून याठिकाणी भाजपने स्वतः निवडणूक लढवावी असा सूर स्थानिक नेत्यांचा आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विभागातील भाजप आमदारांची मते जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यामध्ये बहुसंख्य आमदारांनी नागो गाणार यांच्या उमेदवारीला पसंती दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप नागो गाणार यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
शिंदे गट निवडणुकीपासून दूर
नाशिकची जागाही भाजप लढविणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. भाजपकडून डॉ. राजेंद्र विखे (नगर) धनराज विसपुते (धुळे), हेमंत धात्रक (नाशिक) इच्छुक आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार नसणार हे स्पष्ट आहे.
मविआचे उमेदवार कोण?
महाविकास आघाडीनेही पाच पैकी अद्याप तीनच जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यात औरंगाबाद शिक्षकसाठी राष्ट्रवादीने विक्रम काळेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर कोकणमध्ये शेकापकडून बाळाराम पाटील हे मविआचे उमेदवार असणार आहेत. नाशिक पदवीधरसाठी सुधीर तांबेंना पुन्हा एकदा काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही. अमरावती आणि नागपुरच्या जागेचा मविआत अजून निर्णय नाही.
मुदत संपणाऱ्या सदस्यांची नावं :
– नाशिक पदवीधर – सुधीर तांबे – काँग्रेस
– अमरावती पदवीधर – रणजीत पाटील – भाजप
– औरंगाबाद शिक्षक – विक्रम काळे – राष्ट्रवादी काँग्रेस
– कोकण शिक्षक – बाळाराम पाटील – अपक्ष
– नागपूर शिक्षक – नागो गाणार – अपक्ष