मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्ष फोडण्यावर वक्तव्य केले होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गिरीश महाजन यांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झाले आहे, शिवसेना फोडणे शरद पवार यांचे स्वप्न नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीचे जुनं स्वप्न होतं, त्यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आले. त्यामुळे गिरीश महाजन यांचं मी अभिनंदन करेल असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मी यापूर्वी ट्विट केले होते, त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे होते, त्यात शिवसेना मध्ये येईल म्हणून शिवसेनेचे तुकडे करा असं मी म्हंटलं होतं. म्हणून आधी शिवसेना पक्ष तोडण्याचे काम केले जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय धोरण होते आणि त्यांनी ते राबविले, जे आमच्या खोके बहाद्दर 40 आमदारांना समजले नाही. ते चाळीस आमदार भाजपच्या कटात सहभागी झाले, त्यामुळे शिवसेना पक्ष फोडण्याचा कट अमलात आला असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
राज्यपाल शासन चालवताय
राज्यपाल जर शासन चालवणार असतील निवडून आलेल्यांचे काय असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल फारच सक्रिय होते असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले जणू काही तेच राज्यकर्ते, तेच राज्य सरकार चालवत होते, तेच पत्र लिहीत होते. आता त्यांची पत्र दुसरं कोणी लिहीत आहे का? असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.