चोपडा : शहरातील हॉटेल जयेशच्या मागे विद्युत तारांचा धक्का लागल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भाऊच्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात महावितरणच्या अधिकारी, कर्मचारींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
चोपडा शिवारातील हॉटेल जयेशच्या मागे महाराष्ट्र विद्युत वीज कंपनीच्या 11 के. व्ही विद्युत तारांचे जमिनी पासूनचे अंतर नियमापेक्षा कमी होते. महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा यांनी विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे सदर ठिकाणी 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या अनिता महेंद्र अहिरे (35 वर्षे रा. शेतपुरा चांभारवाडा, चोपडा) ही कचरा वेचत असताना, जमिनीलगत आलेल्या विद्युत तारांचा धक्का लागून मयत झाली होती.
महिलेच्या भावाने दिली फिर्याद
या घटनेस महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा याचे संबंधित अधिकारी व कमर्चारी जबाबदार असल्याची फिर्याद मयत महिलेचा चुलत भाऊ विजय अशोक खजुरे (वय 31, रा. शेतपुरा, चोपडा) यांनी दिली आहे. त्यानुसार चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास नाईक संतोष पारधी हे करीत आहेत.