जळगाव राजमुद्रा | जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू आहे मात्र आता यामध्ये यंत्रणेतील बडे अधिकारी सामील झाल्याने वाळू माफियांचे जोरदार फावत आहे. एका बड्या अधिकाऱ्यां सोबत वाळू माफीयाचा संवाद झाल्याची क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
काय आहे क्लिप मध्ये संवाद ?
या क्लिप मध्ये ” मोठ्या साहेबापासून.. ते महसूल मधल्या वर्ग तीनच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळं मी पाहून घेईल फक्त तुम्ही.., पोलीस पाहून घ्या…, किती गाड्या चालतील प्रत्येकी गाडी प्रमाणे पैसे द्यावे लागतील तुम्ही जर अट पूर्ण केली तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही, असा थेट संवाद आला आहे. महसूल मध्ये वरच्या साहेबा पर्यंत ते खालच्या पर्यंत सर्वच अधिकारी संशयाच्या फेऱ्यात आले आहे. एकूण एक लाख रुपये हप्ता देण्याची देखील भाषा उघड पणे झाली आहे.
या प्रकरणामध्ये जळगाव तहसील कार्यालयातील दोन लिपिकांचा देखील समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांचा संबंध काय ? याबाबत चौकशी केल्यास संपूर्ण प्रकरण उघडकीस येणार आहे. यापूर्वीच गुजरातच्या पावत्या थेट जळगावात तहसील कार्यालयातील ह्याच दोन लिपीकांच्या माध्यमातून सिंडिकेट चालवत वाटप करण्यात आल्या होत्या, गुजरात मधून वाळू वाहतूक केली जात असल्याचा बनाव या पावत्यांच्या माध्यमातून करण्यात येत होता. हे दोन लिपिक अधिकाऱ्यांशी अतिशय घनिष्ठ संबंध ठेवून आहेत याच दोन लिपिकांच्या माध्यमातून वाळू माफिया आर्थिक देवाण-घेवाण अधिकाऱ्यांपर्यंत करतात अशी देखील कुजबुज आहे.
जिल्ह्यात बेसुमार वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र यामध्ये थेट बड्या अधिकाऱ्याचा अद्याप पर्यंत समावेश नव्हता कारण नेमके काही दिवसापूर्वीच काही अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा पदभार घेतला आहे. मात्र त्यांचा देखील सहभाग या प्रकरणात आहे का ? हा देखील संशयाचा विषय पुढील सत्रात असणार आहे. या रेकॉर्डिंग मुळे मात्र महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच वाळू माफिया अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण संबंध ठेवून बेसुमार वाळू उपसा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.