मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लहान महानगरपालिकांमध्ये सदस्य संख्येच्या 10 टक्के स्विकृत नगरसेवक होऊ शकतात.
या महापालिकांमध्ये होणार बदल
शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता महापालिकेत 5 नाही तर 10 स्वीकृत नगरसेवक असतील. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या मोठ्या महापालिकेत किमान 10 स्वीकृत सदस्य असतील. महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात किंवा 10 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात. यापैकी जी संख्या छोटी असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.
शासनाने का घेतला निर्णय?
राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड स्विकृत नगरसेवक (नामनिर्देशित सदस्य) म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या स्विकृत नगरसेवकांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने स्विकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.