अमरावती: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांना जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, धनंजय मुंडे आणि योगेश कदम यांच्यानंतर आता प्रहारचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला चार टाके मारण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचं काही कारण नसल्याचं सांगण्यात आलं.
रुग्णालयात उपचार सुरू
शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात बुधवारी सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले. या अपघातात कडू यांच्या डोक्याला दुखापत झाली. अमरावतीच्या खासगी रुग्णालयात कडू यांच्यावर उपचार सुरू आहेत.