कोल्हापूर: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ईडीन आणि आयकर विभागाने एकत्रितरित्या पहिली कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी ईडीने छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केल्याचे समजते. ईडी आणि आयकर विभागाच्या पथकाने सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी
मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपला काही संबंध नाही असं म्हटलं होतं.