जळगाव :जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या BRM सायकलिंग स्पर्धेत भुसावळ येथील सौ. प्रिया रवी पाटील यांनी जळगाव ते भोकर परत जळगाव व तेथून जळगाव ते घोडसगाव परत रिटर्न जळगाव असे २०० किलो मीटरचे अंतर १२ तासात पूर्ण करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
भुसावळ शहरातील सेंट्रल स्कूल मधील शिक्षिका असलेल्या सौ. प्रिया रवी पाटील यांना सायकलिंगची लहानपणापासून आवड आहे. नोकरी व कौटुंबीक जबाबदारी सांभाळत त्यांनी सायकलिंगचा छंद जोपासला आहे. याच आवडीतून सौ.प्रिया रवी पाटील यांनी जळगाव येथे दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या सायकलिंग स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. त्या भुसावळ तालुक्यातील पहिल्या महिला सायकलिस्ट आहेत.
२०० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण केले
Audax India Randonneur (AIR) ने आयोजित केलेल्या सायकलिंग स्पर्धेची सुरुवात जळगाव येथील आकाशवाणी चौकातून झाली. स्पर्धेत सहभागी सायकलपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. पूर्णपणे भारतीय बनावट असलेल्या सायकलचा वापर करून सौ.प्रिया रवी पाटील यांनी जळगाव ते भोकर परत रिटर्न जळगाव वरून घोडसगाव ते जळगाव रिटर्न असे २०० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण केले. त्यांचे जळगाव सायकलिंग असोसिएशनने विशेष अभिनंदन केले असून भुसावळ तालुक्यातील पहिल्या महिला सायकलिस्ट म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.