चाळीसगाव: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान दवाखाना / नगरपालिका दवाखाना हा ५० हजार लोकवस्तीचे शहरांमध्ये शहरातील जनतेच्या सोयीसाठी दिलेला नगर पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वय साधण्यासाठीचा दुवा आहे. परंतू येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार विवाह नोंदणीबद्दल विचारणा केल्यास सदर कामकाज हे माझ्याकडे नाही, माझ्याकडून काढून घेतले आहे. मला काही माहीत नाही अशी उडवाउडवीच्या उत्तरांमधून सहज दिसून येतो.
मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली विवाह नोंदणी बंद करण्याबाबत याच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना सांगितल्याचे समजते, त्यामध्ये सदर कामकाज हे आयुक्त आरोग्य सेवा यांचा जॉब चार्टमध्ये लिहिले नसल्याबाबत म्हंटले आहे.
वैद्यकीय अधिकारी जॉब चार्टपासून अनभिज्ञ
मागील पाच वर्षे सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जॉब चार्ट बघितला नव्हता की काय? याशिवाय सदर दवाखान्याचे मायबाप केवळ आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई आहेत काय किंवा तालुका जिल्हास्तरावरील कोणी अधिकारी यांना पाठीस घालून आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई यांच्याकडे सामान्य नागरिकांना जाण्यास भाग पाडत आहेत हा प्रश्न जनतेच्या मनात आहे.
रुग्णालयात औषधींची अनुपलब्धता
या दवाखान्याच्या सर्वसाधारण अडचणी जशी लहान बाळाच्या लसीची कमतरता, कोव्हिड बुस्टर लसींची अनुपलब्धता, साध्यात साधे म्हणजे खोकल्याच्या बाटल्या किंवा कुत्र्याचे इंजेकशन उपलब्ध नसल्यास आयुक्त आरोग्य सेवा यांच्याशीच संपर्क करण्याशिवाय पर्याय नसल्याचे वाटते किंवा कदाचित हे सर्व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान दवाखान्याच्या जॉब चार्टमध्ये आहे की नाही हे शोधावे लागेल. तरी प्रतिनिधींना हा महत्त्वाचा जॉब चार्ट उपलब्ध करून घेण्याबाबत सांगितले असून, तो उपलब्ध झाल्यास वाचकांच्या माहितीसाठी निश्चित प्रसारित करण्यात येईल.