मुंबई : शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यामुळे या वादावर आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. सुनावणीत दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक मोठी मागणी केली आहे.
शिवसेनेत दर पाच वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेण्यात येतात. त्यानुसार निवडणुका होऊन गठीत झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या कार्यकाळास येत्या 23 जानेवारी रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुन्हा शिवसेना कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षप्रमुख पदाच्या निवडीसह संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
चिन्ह व पक्षाबाबत निर्णय येईपर्यंत…
शिवसेना पक्षप्रमुख पदासह संघटनात्मक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला जर परवानगी देता येत नसेल व आयोगाच्या काही अटी-शर्ती असतील तर धनुष्यबाण व पक्षाबाबतचा निर्णय येईपर्यंत आहे तशीच स्थिती ठेवण्यास अनुमती द्यावी, अशी विनंतीही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.
चिन्ह गिळंकृत करण्यासाठी शिंदे गटाचा कांगावा
दरम्यान, शिंदे गट नुसता आकड्यांची हवाबाजी करत आहे. निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पडताळणी करावी आणि दोन्ही गटांची परेड घ्यावी. निवडणूक आयोगाने आमच्याकडे कार्यकर्ते किती, अशी विचारणा केली होती. आम्ही 23 लाखांच्या वर दस्तावेज निवडणूक आयोगाकडे सोपविले आहेत. तीन लाख पदाधिकारी व वीस लाख प्राथमिक सदस्यत्वाचे फॉर्म आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठविले आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह अजगरासारखे गिळंकृत करण्यासाठी शिंदे गटाकटून कांगावा केला जात आहे, अशी टीका अनिल देसाई यांनी केली.