औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिंदे गटाचे सरकार आले. यानंतर काँग्रेसचे काही नेते भाजपात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं याच विषयाला धरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे-मोठे नेते येणार असून, महाराष्ट्राला धक्का बसेल असा प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पूर्ण पक्ष रिकामा होईल. शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. अनेक लोकं भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे मोठे नाव आहे. महाराष्ट्राला धक्का बसेल असा प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहे.
आमच्यात नव्हे तर, काँग्रेसमध्येच भांडणं
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बोलतांना ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत शिंदे गट नाराज असल्याचं प्रश्न नाहीच, मी रोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बोलत आहे. सगळ्यांना बोलूनच उमेदवार अंतिम होतात. त्यामुळे धुसफूस आमच्यात नाही, तर महाविकास आघाडीत आहे. नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपुरात बसले असून, त्यांच्यात भांडण सुरु असल्याचे बावनकुळे म्हणाले आहे.
शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा शिवसेनेला संपवण्यासाठी असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देतांना बावनकुळे म्हणाले की, शिवसेना संपवण्यासाठी मोदी यांना येण्याची गरज नाही, त्यासाठी संजय राऊत पुरेसे आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरात बुडवली असून, त्याला आता भाजप बाहेर काढण्याचं काम करत आहे. आम्ही विकासात्मक काम करतो. पंतप्रधान मोदी विकासाकरता येणार असून, आम्ही छोटे कार्यकर्ते शिवसेनेसाठी पुरेसे आहोत. तसेच त्यांच्याकडचे सगळे लोकं आमच्याकडे यायला उत्सुक असल्याचं बावनकुळे म्हणाले आहे.