जळगाव : २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवावी प्रात:कालीन मैफलीचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन मैफल रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता महात्मा गांधी उद्यानात संपन्न होत आहे.
या मैफिलीचे कलावंत तरुण व युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. यामध्ये ओंकार प्रभुघाटे व संपदा माने आहेत. नाट्यसंगीत व अभंगवाणी ने ओतप्रोत भरलेली ही मैफिल संक्रांतीच्या शुभदिनी रसिकांची सकाळ गोड करणारी ठरेल. या कलावंतांना साथ संगत रामकृष्ण करंबेळकर (तबला), गणेश मेस्त्री (पखावज), वरद सोहोनी (संवादिनी), धनंजय कंधारकर (तालवाद्य) व सुसंवादिनी म्हणून अनुश्री फडणीस-देशपांडे निरुपण करणार आहे.
जिल्हाधिकारी करणार उद्घाटन
चुकवू नये अशी ही मैफल तमाम जळगावकरांसाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानची नवीन वर्षाची संक्रांतीची भेट आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. २१ व्या वर्षानिमित्त संपन्न होणाऱ्या या स्वरोत्सवात सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत असून आसन व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य क्रमाने आसन व्यवस्था आहे.
कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद द्यावा
कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) चे संचालक डॉ. दिपक खिरवाडकर, अधिकारी श्रीकांत देसाई व कार्यक्रम अधिकारी श्री. दिपक कुलकर्णी तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी केले आहे.