नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ते शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात खासगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात अनेकांचा जागेवरच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्या मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, 6 महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची पोलिसांनी माहिती दिली. या अपघातानंतर एकच आक्रोश आणि किंकाळ्या सुरू झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील प्रवाशांचा समावेश
अंबरनाथ येथील लक्ष्मीनारायण पॅकेजिंग कंपनी तर्फे त्यांचे कामगार व कुटुंबीयांना एकूण 15 बसेस द्वारे दर्शनाला जात असल्याचे समजते. त्यापैकी अपघात झालेली ही बस पाचव्या क्रमांकाची आहे असे समजते. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी लक्झरी बस क्रमांक MH-04-SK-2751 आणि शिर्डी बाजूकडून सिन्नरकडे जाणारा मालट्रक यांची समोरासमोर धडक होऊन हा आपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरहून साई दर्शनासाठी निघालेल्या 15 बसपैकी ही एक बस होती. ही बस गुरुवारी रात्री शिर्डीसाठी निघाली होती. पण शुक्रवारी पहाटेच्या सुमारा साई भक्तांच्या या बसला भीषण अपघात झाला.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
दरम्यान, नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.