भुसावळ : शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात एका २४ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. बाळंतपणानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने महिलेस जळगाव येथे नेताना महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाईकांनी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मयुर चौधरी यांच्या पथकाने वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर व अन्य नर्स याची तब्बल दिड तास चौकशी करीत जाबजबाब नोंदविले.
भुसावळ शहरातील जाम मोहल्ला सुनी जामा मस्जिदच्या मागे राहात असलेले सायमा असलम शाह (वय २४) यांचा विवाह व्यारा, जि.वापी (गुजरात) येथे झाला होता. २१ मे २०२२ या दिवशी विवाहिता गर्भवती असल्याने प्रसूतीसाठी माहेरी आल्या. या काळात दोन महिन्यापासून पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. बाळांतपणाच्या पूर्ण काळात तेथेच उपचार झाले. २२ डिसेंबर २०२२ यादिवशी प्रसूतीसाठी सकाळी दाखल केले असता डॉ.किर्ती फलटणकर यांनी पाहणी करून अजून प्रसूतीची वेळ आली नाही, असे सांगितले तर २३ डिसेंबर रोजी सायमाला प्रसूतीसाठी नेण्यात आले. यावेळी तिला मुलगा झाल्याचे सांगण्यात आले.
जळगाव येथे नेताना मृत्यू
यावेळी डॉ.फलटणकर या तिथे नव्हत्या, नर्स महिलांनी बाळंतपण केले व विवाहितेला पलंगावर टाकल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने नर्स यांनी तात्काळ महिलेवर पुन्हा उपचार केले आणि जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविले. जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यास आले मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता, जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी २० मिनिटे उशीर झाल्याचे सांगण्यात आले व महिलेस मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी नातेवाईकांनी आरोग्य सेवा उपसंचालक, नाशिक व भुसावळ शहर पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.