मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नव्या परीक्षा पद्धतीवरून आज पुन्हा एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभर तीव्र आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान मुख्य परीक्षेचे नवे पॅटर्न 2025 पासून सुरू करावे आणि अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे या मागणीसाठी सारे रस्त्यावर उतरले आहेत. गेल्यावर्षी पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपासून एमपीएससीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. आता आज संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
एमपीएससीने परीक्षेच्या पॅटर्न आणि सिलॅबसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वर्णनात्मक पद्धती लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता एमपीएससी ची परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवर घेण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
आयोगानं दिला कारवाईचा इशारा
पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत शुक्रवारी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलं आहे. आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होईल असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. उत्तर पत्रिकेत घोळ किंवा प्रश्नपत्रिकेत चूक होत आहे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत म्हणूनच अशा प्रकारांवर आयोगानं लक्ष द्यावे अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत. तसेच आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा आयोगाने दिला आहे.