नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आले आहेत. त्यानंतर त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शनिवारी त्यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले. सकाळी 11.29 वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. एक फोन 11.35 वाजता तर तिसरा फोन हा 12.32 वाजता आला. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
100 कोटी रुपयांची खंडणीची मागणी
विशेष म्हणजे ही धमकी डी गँग अर्थात दाऊदच्या नावाने देण्यात आली आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट झाली आहे. सदर कॉल नेमके कुणी केले, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.
एटीएसकडून तपास सुरू
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. स्थानिक पोलिसांसह अँटी टेररिझम स्क्वाड अर्थात एटीएसची टीमदेखील नागपुरात दाखल झाली आहे.