भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांकडून बंद घरांना निशाना केला जात आहे. शहरातील मुस्लीम कॉलनीत कुटुंब गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 42 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मुस्लीम कॉलनीत मुंताझीर शेख महेमूद (वय 29, बडी खानकाजवळ, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते कुटुंबासह गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 11 ते 12 जानेवारीदरम्यान त्यांच्या बंद घरातून 12 हजारांची रोकड, 16 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे पदक, तीन हजार रुपये किंमतीची सोन्याची बाळी, सहा हजार रुपये किंमतीच्या साकळ्या, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे, नऊशे रुपये किंमतीची चांदीचे चैन लांबवली.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कुटूंब बाहेरगावावरून परतल्यानंतर चोरी लक्षात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.