मुंबई : जर तुम्ही आज आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने किंवा चांदी खरेदीच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशा वेळी सोन्याचा उच्चांकी दराने विक्री होत आहे. सध्या सोन्याचा नवीनतम दर 56,462 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, जो सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने 56 हजार प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला आहे. या आठवड्यात सोने 670 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये, कोरोनाच्या वेळी, सोन्याच्या दराने 56,200 रुपयांचा विक्रम केला. तब्बल अडीच वर्षांनी हा विक्रम मोडला आहे. शुक्रवार, 13 जानेवारी रोजी या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्याच वेळी, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 55,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. संपूर्ण आठवडाभर सोन्याचा भाव 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर राहिला.
आठवडाभरातील सोन्याच्या भावातील बदल
IBJA दरांनुसार, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 56,366 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मंगळवारी, किमती किंचित घसरल्या आणि 56,148 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाल्या. बुधवारी सोन्याचा भाव 56,084 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गुरुवारी भाव 56,110 रुपयांवर बंद झाले आणि शुक्रवारी 56,254 रुपयांवर बंद झाले. चांदीही 68,000 च्या आसपास आहे.
सोने किती रुपयांनी महागले?
गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 55,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यानुसार या आठवड्यात सोने 670 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. या आठवड्यात सोमवारी सोने सर्वात महाग होते. या दिवशी भाव 56,366 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती देतात.
वर्षभरात 12 टक्यांची वाढ
2022 मध्ये बेस मेटल्सच्या किमतींमध्ये बरीच अस्थिरता होती. रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर भारतात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. मात्र दिवाळीनंतर भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सोन्याच्या दरात 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरम्यान, येत्या काळात सोने 62,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही 80,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.