औरंगाबाद : नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. यासाठी पोलीस दल ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले असून, शहरातील विविध भागात धाडसत्र आणि धडक कारवाई करीत पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाखांचा मांजाही जप्त करण्यात आला आहे.
मांजामुळे सर्वसामान्यांचे जखमी होण्याचे प्रमाण पाहता उच्च न्यायालयानेही नायलॉन मांजाप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत. त्यानुसार शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जिन्सी पोलिसांनी साडेआठ लाखांचा तर गुन्हे शाखेच्या पथकाने साडेसहा लाखांचा मांजा जप्त करत दोन भावंडांसह तीन जणांना अटक केली. रोशनगेट, आजम कॉलनीतील मुदस्सीर अहमद नजीर अहमद हा शहरातील पतंग विक्रेता असून त्याचे नवाबपुऱ्यात दुकान आहे. नवाबपुरा येथील दर्गाजवळील इलियास यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा साठा असल्याची माहिती जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांना मिळाली होती.
साडेआठ लाखांचा मांजा जप्त
यावरून त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी मुदस्सीर अहेमद यास ताब्यात घेतले. विचारपूस करताच त्याने नवाबपुरा येथील मशिदीसमोरील बोळीत खोलीत मांजाचा साठा करून ठेवल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्या गोडाऊनमधून साडेआठ लाखांचा मांजा जप्त केला. शहरात जळगाव येथून मांजाचा पुरवठा करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. अशोक भंडारे यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.