धरणगाव : कारचालक हॉटेलमध्ये नास्ता करण्यासाठी गेल्याची संधी साधून भामट्याने कारमधून साडे तीन लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्याची घटना धरणगाव शहरात भर दिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शरीफ खान (37, रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते जळगाव येथून नवीन ट्रॅव्हल गाडी घेण्यासाठी सुरतकडे कारने निघाले व त्यांनी खिशात रोख रक्कम व सोन्याचे दागिने कारच्या बॉक्समध्ये ठेवत मित्र वसीम अली बशारत अली (रा. तांबापुरा जळगाव) यांच्यासोबत प्रवास सुरू केला. याच दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव येथे बस स्थानकासमोर हॉटेल जवळ इनोव्हा कार उभी केली.
तीन महिने घेतला आरोपीचा शोध
यानंतर इम्रान खान आपल्या मित्रासह नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर संधी साधून आरोपी बिलाल मोहम्मदने कारचा दरवाजा उघडून साडेतीन लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्या. इम्रान यांनी संशयीत बिलालचा तीन महिन्यांपर्यंत शोध घेतला, परंतू आढळून आला नाही. अखेर सोमवारी १६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.