जळगाव : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 27 जूलै 2020 रोजी नशिराबाद गावाजवळ घडली होती. मृत प्रौढाच्या वारसांनी विमा कंपनीकडे भरपाईची मागणी केली होती. न्यायालयात सुनावणीअंती वारसांना 50 लाख रुपयांची भरपाईचा धनादेश मंगळवारी देण्यात आला.
जळगाव येथील तांत्रिक महाविद्यालयात वरीष्ठ लिपीक पदावर असलेले दत्तु रघुनाथ भारंबे (वय 53) हे नशिराबाद येथुन दुचाकीने जात असातना त्यांना ट्रकने (एमएच 18 एपी 7866) धडक दिली होती. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात ट्रकचालक धनराज राजेंद्र चव्हाण (रा. फागणे, ता. धुळे) याची चुक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयात केला होता अर्ज
या ट्रकचा रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स येथे विमा काढलेला होता. मृत भारंबे यांच्या पत्नी सुनिता यांनी न्यायालयात अपघाताची भरपाई मिळावी यासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सुनावणीअंती सुनिता भारंबे यांच्यासह मुलगा नयन व मुलगी फाल्गुनी या तीघांना 50 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने केले.
१ कोटी रुपयांची मागणी
भारंबे यांच्यातर्फे अॅड. महेंद्र चौधरी, अॅड. श्रेयस चौधरी यांनी काम पाहिले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. के. शेख यांच्या हस्ते भारंबे यांना धनादेश देण्यात आला. या खटल्यात भारंबे यांनी 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर त्यात तडजोड करून 50 लाख रुपये स्वीकारले.