वरणगाव : भरधाव दुचाकी बोहर्डी (ता.भुसावळ) लगतच्या उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकल्याने मामेभाऊ व आतेभावाचा दुर्देवी मृत्यू झाला. सूरज रामदास तांबे (वय १५, रा.काहुरखेडे) आणि सुनील विठ्ठल भालेराव (वय २०, रा.वाघारी, ता.जामनेर) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी सूरज याच्या मोठ्या भावाचे सोमवारी वर्षश्राद्ध होते. याच दिवशी कुटुंबीयांना दुसरा मुलगा गमवावा लागला आहे.
रामदास तांबे यांचा मोठा मुलगा गोविंदा याचा गेल्या वर्षी अकस्मात मृत्यू झाला होता. त्याच्या वर्षश्राद्धासाठी सोमवारी तांबे यांच्या घरी काहुरखेडे येथे छोटेखानी कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रामदास तांबे यांचा मुलगा सूरज तांबे (वय १५, रा.काहुरखेडे) आणि भाचा सुनील विठ्ठल भालेराव (वय २०, रा.वाघारी ता.जामनेर) हे दोघे मामेभाऊ व आतेभाऊ काहुरखेडे येथून बोहर्डीकडे दुचाकीने जात होते.
उपचारादरम्यान मृत्यू झाला
दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बोहर्डीजवळ त्यांची अनियंत्रित झालेली दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली. त्यात सूरज तांबे याचा जागीच मृत्यू झाला. तरसुनील भालेराव हा गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण, उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत सूरज याचे शवविच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ. क्षीतिजा हेंडवे यांनी केले. रात्री उशिराने अंत्यसंस्कार झाले.
पिंपळकोठ्याजवळ दोन ठार
नाशिककडे भरधाव जाणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून दुचाकीला धडक दिली. या दोन युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. पिंपळकोठा (ता. एरंडोल) गावाजवळील महामार्गावर सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला. नितीन जामसिंग पाटील (वय २५), घनश्याम भानुदास बडगुजर अशी दुचाकीवरील दोन्ही मृतांची नावे आहेत. तर नारायण धनसिंग पाटील असे जखमीचे नाव आहे.