(राजमुद्रा, जळगाव) भाजपच्या कार्यकर्त्यांद्वारे पश्चिम बंगालच्या हिंसाचार विरोधात निषेध म्हणून शहरात मध्यवर्ती चौकात आंदोलने करण्यात आली. यात जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांचाही सक्रिय सहभाग होता. याविरोधात एन.एस.यू.आय (नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे) जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. कोरोना काळात जळगावकरांना आमदारांची गरज असताना ते घरामध्ये लपून बसले होते मात्र आता पश्चिम बंगालच्या भाजप कार्यकर्त्यांचा त्यांना एवढा पुळका का आला? असा आरोप त्यांनी केला आहे.
शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या कामकाजावर भाष्य करत मराठे यांनी काही सवालही उपस्थित केले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र आज भाजपच्या नेत्यांना खुष करण्याच्या हेतूने कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत बंगाल विरोधी आंदोलनात सहभाग घेत दुर्देवी जळगावकरांची एकप्रकारे थट्टा केली असल्याचा आरोप एन.एस.यू.आयच्या वतीने देवेंद्र मराठे यांनी केला आहे.
आमदार पदावर असतानाही भोळे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून शहरात कोविल सेंटर का उभारले नाह? मोफत कोविड रुग्णालय का सुरू केले नाही? दारूच्या दुकानांसारखी कोविडच्या रुग्णांची चौकशी का केली नाही? रुग्णांची खाजगी रुग्णालयात होणारी लूट पाहता कोणत्याही रुग्णाचे बिल कमी का करून दिले नाही? असे प्रश्नही मराठे यांनी उपस्थित केले आहेत. आमदारांनी आमदार निधीतून शहरातील हातावर पोट असणाऱ्या किती लोकांची मदत केली आहे, त्याचा जाहीर खुलासा करण्याची मागणीही देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केली.