जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगावात एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून कृषी कायद्याविषयीच्या प्रतिचे दहन करण्यात आलं. त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाचा पुनरुच्चार केला.
निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिले आहेत. आम्ही बोललो आहे, आता माघार घेणार नाही, असं पटोले म्हणाले.
आता भाजपाच जनतेची दिशाभूल करत आहे, ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही नाना पटोलेंनी दिली.
दरम्यान, नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी स्वबळाची घोषणा केली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली. तसेच पटोलेंच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत तणावाचं चित्र निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.