नवी दिल्ली: तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणीत पडायचे नसेल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. दुर्लक्ष केल्यास, तुमचा पॅन निष्क्रिय होऊ शकतो. आयकर विभागाने ट्विट करून कार्डधारकांना सतर्क केले आहे.
आयकर विभागाने ट्विटरद्वारे सांगितले आहे की, 31 मार्च 2023 पर्यंत तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करा. तसे न झाल्यास 1 एप्रिलपासून कार्ड निष्क्रिय केले जाईल.
ट्विटद्वारे दिला इशारा
आयकर विभागाने मंगळवारी, 17 जानेवारी रोजी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पॅनकार्डधारकांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारकांना (जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत) 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. लिंक न केलेला पॅन 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय असेल. आपल्या ट्विटमध्ये आयकर विभागाने लिहिले, ‘तातडीची सूचना. उशीर करू नका, आजच लिंक करा!
दुर्लक्ष करणे महागात पडणार
आयकर विभागाचा हा संदेश हलक्यात घेणे तुमच्यासाठी महागात पडू शकतो. याचे कारण म्हणजे आजच्या काळात पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, जे तुमच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारांशी जोडलेले राहते. प्राप्तिकर विभाग या कार्डवर नोंदवलेल्या क्रमांकाद्वारे कार्डधारकांचा संपूर्ण आर्थिक डेटा रेकॉर्ड करतो. अशा परिस्थितीत, हा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, अन्यथा आपण आणखी अडचणीत येऊ शकता.
तर ही समस्या वाढणार
जर तुम्ही तुमचा पॅन 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केला नसेल आणि तो 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय झाला असेल. मग अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही. समस्या इथेच संपणार नाही, कारण पॅन कार्ड अवैध असल्यास, तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक, बँक खाते उघडू शकणार नाही, जेथे पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य आहे.