मुंबई : भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढल्यानंतर आता केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तारही होणार आहे. यात शिंदे गटाच्या तीन खासदारांना संधी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलं आहे. राज्यात शिंदे गटातील 9 आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यानंतर आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यात शिंदे गटातील खासदारांना संधी मिळणार आहे.
शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे, या खासदारांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते.आगामी काळात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका व 9 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपमध्ये मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. शिवसेनेच्या खासदारांना मंत्रीपद देऊन महाराष्ट्रातही राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या खासदारांना संधी मिळणार
केंद्रात मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून तीन खासदारांची नावे पुढे आली असून या तीन खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये, 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद शिंदे गटाला मिळणार आहे. या मंत्रीपदासाठी शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, खा. श्रीरंग बारणे आणि खासदार प्रतापराव जाधव यांची नावे समोर आली आहेत. राहुल शेवाळे यांना मंत्रीपद देऊन आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबईत शिंदे गटाचे आणि भाजपचे हात बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे. तर, श्रीरंग बारणे यांना मंत्रीपद देत पवारांच्या बालेकिल्ल्यात आणि प. महाराष्ट्रात शिंदे गटाला ताकद देत भाजपलाही वाढविण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा आहे. तसेच, विदर्भातील नेते प्रतापराव जाधव यांनाही मंत्रीपद देऊन प्रादेशिक समतोल राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.