मुंबई : जागतिकीकरण, वाढती अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे भारताला कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या ‘त्सुनामी’चा सामना करावा लागणार आहे. अमेरिकेतील ओहायो येथील क्लीव्हलँड क्लिनिकमधील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर जेम अब्राहम यांनी असं भाकित वर्तवलं आहे.
डॉ. अब्राहम यांनी मनोरमा ईयर बुक 2023 मधील एका लेखात ही माहिती दिली आहे. यात नमूद केले आहे की, या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय तंत्राचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असं डॉ. जेम अब्राहम यांनी सांगितलं आहे.
कर्करोगावरील उपचारांची दिशा बदलेल
ही आपत्ती टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपचारपद्धती स्वीकारणे अत्यावश्यक ठरेल. कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांतील सहा ट्रेंडपैकी लस, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार तसेच द्रव बायोप्सीद्वारे कर्करोगाचे निदान यामुळे या शतकात कर्करोगावरील उपचारांची दिशा बदलेल असे डॉ. अब्राहम यांनी सांगितले आहे.
एक कोटी लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू
आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या अंदाजानुसार, 2040 मध्ये जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 28.4 दशलक्ष असेल, जी 2020 च्या तुलनेत 47 टक्के जास्त असणार आहे. जागतिकीकरण आणि वाढत्या अर्थव्यवस्थेशी संबंधित जोखीम घटकांमध्ये वाढ झाल्यामुळे ही संख्या वाढू शकते. 2020 मध्ये जगभरात कर्करोगाचे अंदाजे 1.93 कोटी नवीन रुग्ण आढळले आणि सुमारे एक कोटी लोकांचा कर्करोगामुळं मृत्यू झाला.