मुंबई : मागील काही दिवसांपासून दररोज सातत्याने अपघात होत आहेत. शिर्डी येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. यात पहिल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 23 प्रवासी जखमी झाले. पहिला अपघात ट्रक आणि इको कारचा झाला, तर दुसरा अपघात खासगी बसचा झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव हद्दीत पहाटे 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास मौजे रेपोली येथे भीषण अपघात झाला. लोटे एमआयडीसीकडून मुंबईकडे जाणारा ट्रक (MH 43 U 7119) आणि मुंबईकडून हेदवी गुहागर येथे जाणारी इको कार (MH 48 BT 8673) या दोन्ही वाहनांची जोराची धडक झाली. धडक इतकी भयानक होती की, त्यामध्ये ईको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
कारमधील दहा जण ठार
या अपघातामध्ये इको गाडीतील पाच पुरुष व तीन महिला व एका लहान मुलीचा अशा एकूण 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक बालक जखमी झाला होता. दुर्दैवाने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
खासगी बस अपघातात 4 ठार
दुसऱ्या अपघातात पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा महामार्गावर हळवल फाटा येथे भीषण अपघातात झाला. या अपघातात 4 ठार तर अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. बस मध्ये एकूण 37 प्रवासी होते.